सलोखा.
माझ्या मते आई हि एक निखळ मैत्रीण असते .आपण लहान असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टीत ती आपल्या सोबत रमलेली असते ,रंगून जाते .त्याचबरोबर माझ्या बाळाला अमुक एखादी गोष्ट वेळेवर मिळाली पाहिजे असा तिचा कटाक्ष असतो म्हणजेच एक जबाबदारीची जाणीव असते . आता प्रश्न उरतो तो आपण., म्हणजे तिचे बाळ जेव्हा मोठे होते,तेव्हा तिची आपल्या पुढेमागे जी लगबग चाललेली असते त्याकडे आपण कोणत्या भूमिकेतून बघतो याची . तिने आपल्यासाठी अनंत कष्ट उपसलेले असतात याची जाणीव ठेवून आपण तिच्या वयपरत्वे वर्तनाकडे किंवा भावनिक गरजेकडे पाहणे अपेक्षित असते. तेव्हा कुठे आपण तिने आपल्यासाठी केलेल्या अनंत उपकारातून थोडेफार तरी उतराई होऊ . जी सहज समर्पित वृत्ती आईकडे असते तसाच तिच्या वृद्धापकाळात सुद्धा आपण तिचा आधारवड झाले पाहिजे, तेव्हाच तिचे जीवन कृतार्थ होईल .अर्थात हे सगळं करत असताना आपणही आई आणि पाल्य या दोन्ही भूमिका तितक्याच समर्थपणे पेलणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या स्वभावात अनुकंपा पाहिजे . एकमेकांबद्दल आदर पाहिजे दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये मुलांना सुद्धा सहभागी केले तर त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. जसा आपल्या आईने आपल्याला लहानपणी आपला आत्मविश्वास उंचावण्यास मदत केली होती तीच भूमिका आपल्याला आता पार पाडावयाची आहे. आपली मुले आपलेच अनुकरण करून इतरांशी त्याप्रमाणे वागतील याची आपण पदोपदी जाणीव ठेवून वर्तन केले पाहिजे .आपले वागणे , बोलणे इतरांना हवेहवेसे वाटेल असे असावयास हवे.
माझं कुटुंब हा माझा भक्कम बालेकिल्ला आहे. या कुटुंबात माझ्या सगळ्या , शारीरिक मानसिक , भावनिक गरजा पूर्ण होतात असं आश्वस्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे. आपल्या कुटुंबामध्ये खेळीमेळीचे हलके-फुलके वातावरण ठेवले तर मुलांच्या शाररिक वाढी बरोबरच मानसिक आणि भावनिक विकास होण्यास मदत होते . आपले आई-वडील आपल्या पाठीशी प्रत्येक परिस्थितीत उभे आहेत असा आत्मविश्वास मुलांमध्ये येतो आणि त्यांच्यामध्ये एक वेगळीच चमक निर्माण होते . आणि इतरांशी वर्तन करताना आपोआपच त्यांच्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेम , कृतज्ञता ,संवेदनशीलता विनयशीलता , प्रामाणिकपणा, सचोटी, दया या मूल्यांचा समावेश होतो . कौटुंबिक वातावरण जितके सलोख्याचे तितके ते मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यास उपयुक्त ठरते .
आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना समाजात वावरताना , इतरांची मदत करताना पाहतात तेव्हा त्यांच्या मनातही हे मूल्य आपोआप रुजले जाईल की आपणही इतरांची मदत केली पाहिजे गरजवंताला त्याच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडले पाहिजे.
"साथी हाथ बढाना..
एक अकेला थक जायेगा ..
मिलकर बोज उठाना "...
हे त्यांना आपल्या उक्ती तूनच नाही पण कृतीतूनही दिसले पाहिजे. जेव्हा समाजात आपण एकमेकांच्या उपयोगी पडतो तेव्हा एक समाजप्रिय व लोकप्रिय व्यक्ती म्हणून आपोआपच प्रसिद्धीस येतो. हा सामाजिकीकरणाचा चा धडा आपण आपल्या पाल्यावर लहानपणीच गिरवण्यात यशस्वी झालो तर कदाचित वर्गा वर्गामध्ये आपल्याला मूल्यशिक्षणाचे वेगळे पाठ घ्यायची गरज भासणार नाही.
या आधुनिकीकरणाच्या काळात, एकविसाव्या शतकात जेव्हा मुले आपल्या आजी आजोबांना वृद्धाश्रमात अनाथाश्रमात ठेवलेले बघतील तेव्हा आपल्या मनात हा विचार आला पाहिजे की आपली मुले ही कदाचित आपल्याशी असेच वर्तन करतील .जे पेराल तेच उगवेल मग का नाही आपण सुरुवातीलाच त्याची काळजी घेऊयात आणि या चिमुकल्यान्वर कोवळ्या वयातच योग्य मूल्य संस्कारांची रुजवणूक करूयात. आपण आपल्या आई-वडिलांप्रती समाजाप्रती काहीतरी देणे लागतो याची जाणीव आपल्या कृतीतूनच त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात. उतारवयात त्यांच्या मनाला दुःख होईल असे न वागता त्यांच्या छोट्या छोट्या खुशी मध्ये सामील होता आले पाहिजे.
त्यांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जे काही देऊ केले त्याबद्दल नेहमीच आपण कृतज्ञ असले पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी अमुक एक गोष्ट केली नाही असं त्यांना कधीही बोलून दुखावू नये . तुमच्या कामात तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी काही वेळ काढून त्यांच्याशी गुजगोष्टी करा त्यामुळे त्यांना आभाळाएवढा आनंद मिळेल . उतारवयात त्यांच्या अगदी क्षुल्लक अपेक्षा असतात.. आपल्या मुलाने - मुलीने आपल्याशी बोलावे, आपल्याला काय हवं-नको ते पहावे त्यांचं सुख , त्यांची यशस्विता भरभरून पहावी बस एवढीच त्यांची अपेक्षा असते.
आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्यासाठी एवढं आपण नक्कीच करू शकतो .
"ज्या पंखात त्यांनी बळ दिलं ... आकाशात गरुड झेप घेण्याचे सामर्थ्य दिलं, त्यांच्या प्रति आपण एवढे कर्तव्य नक्कीच निभावू शकतो"...!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा