कोविड - १९ चा समाज आणि शिक्षणावरील परीणाम :
 एक मंथन


                  २०२०  साल उजाडलं एका सळसळत्या उत्साहाने पण महिन्याभरातच त्या उत्साहावर विरजण पडलं.  डिसेंबर २०१९ मध्ये  कोविडचा पेशंट सापडला. पण आपल्याकडे अजून आलबेलच होतं हळूहळू लोन पसरत चाललं आणि ते इतकं वाढलं की जानेवारी फेब्रुवारी मध्ये कोविड वर जोक फॉरवर्ड करणारे अचानक सिरीयस झाले, हे काही तरी भयंकर आहे एवढी जाणीव त्यांना नक्की झाली. आणि मार्च च्या मध्यावर तर परिस्थिती इतकी बिघडली की जगाच्या पाठीवरील इतर देशाप्रमाणे आपल्यालाही लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. 

            खरी सत्त्वपरीक्षा सुरू झाली साधारण १७ मार्च पासून. काही समजायच्या आतच अचानक सगळं जग ठप्प झालं कुठे बाहेर पडणे नाही की जाणे - येणे नाही. वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली. इतिहासात कधीही घडले नाही अशी मुंबईची लाईफ लाईन रेल्वे बंद करावी लागली. सगळं जग जणू सैरभैर झालं. मानवी जीवन व त्यांचे दैनंदिन वर्तन यामध्ये आमूलाग्र  बदल झाले. आपल्या आयुष्यात कधी अशी वेळ येईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. सकाळी उठून ऑफिसला जाण्याची लगबग असायची.. ती आज मंदावलेली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे शक्यतो टाळले जाते. दिवस-रात्र घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. मुलांचे बाहेर खेळणे बंद झालेले आहे. व्यक्ती-व्यक्ती मधील संवाद वाढलेला आहे. सर्वजण एकमेकांची काळजी घेत आहेत. काही ठिकाणी कौटुंबिक हिंसाचारात देखील वाढ झालेली आहे. आणि नातेवाईकांचा संपर्क तुटल्यामुळे एखाद्या बेटावर कोंडून ठेवल्यासारखी सर्वांची स्थिती झाली आहे.

               अशा सामाजिक परिस्थिती बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अनेक आमूलाग्र  बदल झाले आहेत. सुरुवातीचा महिना तर बऱ्यापैकी गोंधळातच गेला. मुलांचे तास कसे घ्यायचे..? ऑनलाइन क्लास घेणे आणि अटेंड करणे सगळ्यांना शक्य आहे का..?  या आणि अशा अनेक प्रश्नांनी सर्वजण विवंचनेत सापडले. पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षणाकडे हळूहळू  प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वांचाच कल वाढू लागला; किंबहुना ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागात तर अजूनच हलाखीची परिस्थिती. अत्यावश्यक सोयी सुविधांचा अभाव शिवाय आर्थिक तंगी… त्यामुळे ऑनलाइन शिक्षण नको पण कोणी खायला देता का…? या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमुळे शिक्षकांचे डोळेही पाणावत होते.  लॉक डाऊन मुळे आई - वडील घरात बसून असल्यामुळे व काम धंदा नसल्यामुळे घरात घरखर्चासाठी पैसेच नाहीत , तर मोबाईल, इंटरनेटचे रिचार्ज कसे करणार…?  आणि ऑनलाइन शिक्षण कसं घेणार..? हा खरा यक्षप्रश्न आहे.

           शहरी आणि निमशहरी भागात हळूहळू विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून शिक्षण सुरू झाले खरं परंतु त्याचेही कौतुक पहिले काही दिवसच वाटले. अजून पूर्णपणे ऑनलाइन शिक्षण पद्धती चालू झाली नाही तरी मुले आत्ताच कंटाळली आहेत. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले आता मुले नाईलाजानेच मिटींग्ज अटेंड करतात. 

             शाळा एक मंदिर असते ते वातावरण घरी कसे मिळणार.., शिवाय  शिक्षक प्रत्यक्ष समोर नसल्यामुळे  त्यांची शाबासकीची,  कौतुकाची थाप  पाठीवर  कशी मिळणार..? आणि मुलांचा शारीरिक मानसिक विकास खुंटला जाईल. त्यांच्या डोळ्यांना आणि पाठीला त्रास होईल तो वेगळाच.  फक्त अभ्यास एके अभ्यास. शाळेत असतो तसा  ना शारीरिक व्यायामाचा  तास,  ना मधली सुट्टी व ना मित्र-मैत्रिणींबरोबर  डबा खान्याचा / शेअर करण्याचा आनंद. मग एवढे सगळे नसताना त्या मुलांचा सामाजिक विकास, सामाजिकीकरण कसे होणार...?

           कोव्हीड १९ चा  शिक्षण व्यवस्थेवर खरोखरच गंभीर परिणाम झाला आहे. पूरक व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षणाकडे बघितले तरी याचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक आहेत असे मला वाटते. ते  पुढील  प्रमाणे.    

  • शाळांचे अस्तित्व संपुष्टात येईल.
  • मुले एकलकोंडी होतील. वर्ग,मित्रमैत्रिणी असा प्रकारच राहणार नाही.
  • पुस्तकांची गोडी कमी होईल, किंबहुना पुस्तकी परिभाषाच नष्ट होईल.
  • वाचन संस्कृती लोप पावेल.
  • ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुले मोबाईलच्या आधीन होतील.
  • शिक्षण कंटाळवाणे होईल.
  • समस्येवर उपाय सापडणार नाहीत.
  • मुलांचा आत्मविश्वास कमी होईल.
  • विद्यार्थी भरकटेल ……शाळेपासून कोसो दूर होईल.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल... सगळ्यांना चष्मा लागेल.

            या सर्व गोष्टींचा विचार करता ऑनलाईन शिक्षण हे फक्त या  कोविड संकटावर मात करण्यापुरतेच मर्यादित असावे. वरील मुद्द्यांबरोबरच इतरही काही बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. जसे की -

१     वर्गात शिक्षक स्वतः प्रत्येक मुलाकडे लक्ष देऊन अभ्यास करून घेतात या गोष्टीवर मर्यादा येतील.

२    ऑनलाईन शिक्षण पद्धती साठी मोबाईल आणि इंटरनेट सुविधा प्रत्येकाकडे उपलब्ध असेलच असे नाही.

३     मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले तर त्यांना ते किती आकलन होईल यात जरा शंकाच आहे. 

          या  महामारीने आपल्या सर्वांच्या  जीवन पद्धतीत आमूलाग्र बदलाची नांदी जन्माला घातली आहे. या बदलाला आपण वैयक्तिक, सामुहिक आणि सार्वजनिक पातळीवर धैर्याने कसे सामोरे जातो यावरच आपला पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे. अशा काळात परंपरागत जीवन आणि विचारसरणी सुटता सुटत नाही तसेच नव्या बदलाला सामोरे जाण्याची तयारी होतांना सर्वार्थाने दिसत नाही.

           उच्च शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर आता वेगवेगळ्या संस्थांनी शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू केले आहेत. त्यासाठी वेगवेगळे LMS. म्हणजेच लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम सुरू केले  आहेत.  यावरून विविध सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन याविषयीचे ज्ञान देऊन शिक्षकांना टेक्नोसॅव्ही करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वच स्तरावरील शिक्षक अद्ययावत व्हायचा प्रयत्न करत आहेत. पण हातात वेळ नाहीये.  काय करू नि काय नको इतके ते गोंधळलेले आहेत.  सगळी कडूनच एफ.डी.पी,  सेमिनार, वेबिनार चा भडिमार सुरू असल्यामुळे शिकणं कमी आणि  फक्त सर्टिफिकेट साठी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. पण खरोखरच ज्ञान मिळवायचे असेल तर अशा पूर्व बांधणी केलेल्या कोर्सेसची गरजच काय? आपण माहितीच्या विस्फोटात  जगतोय. जगातल्या कोणत्याही विषयाची अद्ययावत व सखोल माहिती अगदी काही सेकंदात आपल्या फिंगरटिप वर येऊ शकते. मग या ऑनलाईन मिळणाऱ्या सर्टिफिकेटची गरजच काय..?

        या कोविड च्या काळात अनेक लोकांचा रोजगार गेला. कित्येक लाख लोक आपापल्या गावी परत  गेले. गड्या आपला गाव बरा: असे म्हणत अनेक परप्रांतीयांचे तांडेच्या तांडे अगदी पायी चालत परराज्यात पोहोचले. या सगळ्यात अनेकजण उपासमारीने मरण पावले तर काही जण पायी चालता चालता, रेल्वे रुळावरून जाताना मरण पावले. मनाला अगदी  विषन्न करून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. अनेक तरुणांनी गावी जाऊन भाज्यांचे मळे फुलविले.  काही जणांनी एकत्र येऊन छोटेखानी उद्योग सुरू केले.  काहींनी सैनीटायझरच्या  मशीन चा शोध लावला.  या सगळ्या वरून एक गोष्ट अधोरेखित होते ती ही की आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.

             कोविडोउत्तर शिक्षण हे प्रामुख्याने कौशल्यावर आधारित असावयास हवे. 

१.    नवीन शैक्षणिक धोरणानुसार (५+३+३+४ ) शालेय शिक्षणापासूनच कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.

२.   ग्रामीण भागात इंटरनेटसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे.

३.    आपलं शिक्षण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचते का..? शिक्षणाचा हेतू आणि उद्दिष्टे साध्य होत आहेत का..? हे पाहणे ही गरजेचे आहे.

४.    यूजीसीच्या गाईड लाईन नुसार ई - कंटेंट कसा निर्माण करायचा याचे प्रशिक्षण शिक्षकांना देणे गरजेचे आहे.

५.    विद्यार्थी कम्फर्टेबल आहेत का? ऑनलाइन जो मजकूर त्यांना मिळतो त्याचे त्यांना आकलन होते का हे पाहणेही गरजेचे आहे.

६.    लॉक डाऊनमुळे घर हेच शिक्षणाचे स्थान झाल्यामुळे योग्य शैक्षणिक वातावरण सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल का..? अनेकांना  गॅजेट्स, इंटरनेट या सुविधा दुरापास्त आहेत. त्यांच्यासाठी काय करता येईल..? याचाही विचार होणे गरजेचे आहे.

७.   शिक्षण पद्धतीत सिंक्रोनस आणि असिंक्रोनस मोड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सिंक्रोनस म्हणजे वन-टू-वन ऑनलाईन क्लासेस घेणे.  ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळी समोरासमोर उपलब्ध असतील.आणि असिंक्रोनस म्हणजे विद्यार्थी समोर नसताना त्यांच्यासाठी डिजिटल स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणे. म्हणजे ते त्यांच्या वेळेनुसार व सोयीनुसार आपला अभ्यास पूर्ण करू शकतील.

८.   ग्रामीण व शहरी भागासाठी सर्वसमावेशक शिक्षणाचे आयोजन व नियोजन कसे करावे याची रुपरेखा ही तयार करणे गरजेचे आहे.

९.  सामाजिक समता बाधित न होता सर्वांना सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर ताण निर्माण होणार नाही. अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण व शहरी किंवा सर्व सोयींनी युक्त व सोयींचा अभाव असणारे अशी दुफळी निर्माण होईल. ती आपणास  अत्यंत जबाबदारीने टाळावयास हवी. 

१०.   प्रशासकीय व परीक्षा संबंधी अनेक आव्हाने निर्माण झालेली  आहेत. परीक्षांचे आयोजन, नियोजन व परीक्षण कसे करावे याविषयी सगळ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झाले आहेत.

११.   शिक्षणामध्ये ब्लेंडेड लर्निंग चा समावेश करणे ही काळाची गरज आहे. परंतु प्रत्येकाकडे लॅपटॉप असणे शक्य नाही पण कमीत कमी मोबाईल लर्निंग ची सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनापुढील एक मोठे आव्हान आहे. शिवाय ग्रामीण भागातील समस्या आणखीनच वेगळ्या आहेत.

       जिथे  लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तिथे आपण सरसकट ऑनलाइन एज्युकेशन कसे  राबवू शकतो…? आत्मनिर्भर भारत वगैरे या गोष्टी डायस वरून बोलायला जेवढ्या गोंडस वाटतात.,तेवढीच ग्राउंड रियालिटी भयंकर आहे.  या सर्व गोष्टींचा विचार करता आपण  विद्यार्थ्यांना Content, Context , Collaboration & Empathy  या चार गोष्टी देणे गरजेचे आहे. तेव्हा आपण या Pandemic वर यशस्वीरीत्या मात करू शकतो.

           आज पर्यंत जगावर, आपल्या देशावर अनेक  संकटे  आली आहेत. परंतु आपण प्रत्येक संकटावर धीराने, यशस्वीरीत्या मात केली आहे असा आजवरचा इतिहास आहे. तसेच हे ही दिवस जातील. आणि या महामारीच्या विळख्यातून आपण एक दिवस नक्की बाहेर पडू आणि पुन्हा नव्या उमेदीने नवीन जगाला सामोरे जाऊ. 

म्हणतात न...,

“लहरों से डरकर कभी नौका पार नही होती ..,

और कोशिश करने वालों की कभी हार नही होती …!!

 

                                                                     अरुणादेवी कुरणे. (सहाय्यक प्राध्यापक)                  शिक्षणशास्र विभाग. मुंबई विद्यापीठ.               

                    


                                                                       

                                                                         

                                                                       

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिंदगी जिंदादिली का नाम है...!!