ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....!!
ती आई होती म्हणूनी …..घन व्याकुळ मी ही रडलो…
त्यावेळी वारा सावध…... पाचोळा उडवीत होता ....l
ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll
अंगणात गमले मजला .., संपले बालपण माझे..
खीडकीवर धुरकट तेंव्हा ... कंदील एकटा होता...
ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll
१६ सप्टेंबर २0२0 हा दिवस आमच्या आयुष्यातील अतिशय काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल...ती काळरात्र आम्ही
कधीच विसरणार नाही .. त्या आधी दोनच दिवसापूर्वी तिचा फोन आला होता... मला दोन दिवसात भेटून जा एवढचं म्हणाली
होती... तिचं ते बोलावणं मला आजही अगम्य वाटत आहे. जणू काही काळाची झडप तिला दिसत होती. आम्ही १६ तारखेला
पहाटे ५ वाजताच घरी पोहोचलो होतो.. तेव्हापासून मी तिच्या उशा-पायशालाच बसले होते ...ती बोलत होती., काय हवं - नको
ते सांगत होती.., तिने डाळिंबाचे दाणे दोन - तीन चम्मच खाल्ले ., एक सफरचंदाची फोड चापलून टाकली .,ताई ने सूप बनवले
होते.. थोडंसं खाऊन घे म्हंटलं कि चिडत होती . मला काही खायला आग्रह करू नका,मला हवं तेव्हा मी मागेण असं म्हणत
होती. काही खायची तिची इच्छाच जणू मेली होती... साधारण ४ च्या सुमारास मला म्हणाली आता मला थोडंसं सूप दे. मी तिला
सूप पाजले.. तीन -चार चम्मच सूप तिने महत्प्रयासाने पिले...पण हि तिची शेवटची घालमेल आहे हा विचार हि मनाला शिवला
नाही. ती सकाळपर्यंत सायपी होऊन उठून बसेल असं वाटत असतानाच संध्याकाळी साडेआठच्या सुमारास तिची प्रचंड
तलकली झाली. पण कोरोना काळ असल्यामुळे हॉस्पिटल्स उपलब्ध झाली नाहीत ..जी होती ती सगळी कोरोना सेंटर असल्या
मुळे तिथे हि घेत नव्हते..शेवटी मिरज मिशन कोविड सेंटर ला एक बेड उपलबध झाला ..पूर्ण पॉजिटीव्ह कोविड सेंटर असल्या
मुळे त्यांनी पेशंटला आत घेतल्यावर आम्हाला तिथे थांबू दिले नाही . अतिशय भयानक परिस्थिती होती ती... आम्ही रात्री
साडेबाराच्या सुमारास तेथून घरी येण्यास निघालो ..तोपर्यंत तिला आय सी यू मध्ये हलवले होते.. घरी पोहचेपर्यंत पावणेदोन
वाजले होते.. मन सैरभैर होते..मोठया ताईला घरीच ठेवले होते. कारण अण्णांच्या जवळ कोणीतरी असणे गरजेचे होते. आम्ही
आल्यावर ताईची जी अवस्था होती ती शब्दात मांडता येण्यासारखी नाही...आणि साधारण पावणेतीन वाजता हॉस्पिटल्समधून
फोन आला . माझ्या आईवर काळाने क्रूर झडप घातली होती... रात्री तीन वाजता पुन्हा दादा, सुजाताई आणि मोठे भाऊजी
हॉस्पिटलला गेले . पण त्यांनी बॉडी द्यायला नकार दिला. कारण रात्री ३ पासून पॉसिटीव्ह कोरोना डेड बॉडीज जिथे ठेवल्या
होत्या त्याच शवागारात आईला हि ठेवले होते. दादाने त्याचे कॉन्टॅक्टस वापरून कमीत - कमी मुखदर्शन तरी होईल का
म्हणून खूप प्रयत्न केले . त्याप्रमाणे सकाळी ८ वाजता सेंटर वरून फोन आला. तुम्ही अंत्यदर्शन घेण्यासाठी येऊ शकता.....
आम्ही लगेच निघालो.. त्या प्रवासाचे वर्णन मी शब्दात नाही करू शकत... 😭😭 बाहेर पावसाची रिमझिम चालू होती...
आणि आत -- तो प्रचंड कोसळत होता... सारं अवकाश क्षणार्धात उध्वस्थ करून टाकलं होतं त्यानं....
कवी ग्रेस यांनी कधीकाळी लिहून ठेवलेल्या पंक्ती जणू आज जीवंत झाल्या होत्या ...
ती गेली तेंव्हा रिमझीम पाऊस निनादत होता.....ll
माझी आई, सौ सुमन .. नावाप्रमाणेच कोमलहृदयी असणारी ... काळाच्या पडद्या आड गेली... तिचं जाणं इतकं
अनपेक्षित होतं की काही कळायच्या आतच सगळं काही संपलं होतं ... ती आमच्यात आता नाहीये , ही कल्पनाच जीवाला
चटका लावून जाणारी आहे...अजूनही तिचं जाणं आमच्यासाठी अकल्पित... , अगम्य..., पण कटूसत्य आहे....😢😭😭
आयुष्यभर कधी ही ., घरी येणाऱ्या कोणालाही.., रिकाम्या हाती न पाठवणारी माझी आई -- तिला मात्र या शेवटच्या प्रवासात
हळदी - कुंकू हि लावता नाही आले.. सुवासिनीचे मरण येऊन ही तिचे कोणतेच सोपस्कार ., अंत्यविधी ., या कोविड
महामारीमुळे करता नाही आले ... हृदय पिळवटून टाकणाराच प्रसंग होता तो ... अशी वेळ कोणावर हि येऊ नये....
या दिड दिवसात ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नाही ते सगळं विदारक अनुभवायला मिळालं... जीवन किती क्षणभंगुर
आहे हे विस्कटून सांगायला खरंच शब्द तोकडे पडताहेत...
आई तुझ्याबद्दल किती बोलू आणि किती लिहू असा मला झालं आहे..., पण मला खरंच कळत नाहीये... कुठून
सुरुवात करू आणि कशी... ?? आई कधी कधी तिच्या लहानपणीच्या गोष्टी आम्हाला सांगत असे... त्यातलाच एक एक
प्रसंग उलगडत गेले कि तिचं आत्मचरित्र आपोआपच आकार घेतं....
तिच्या अगदी जन्माच्या वेळेपासूनच सटवाईने तिच्या नशीबी काय लिहून ठेवलहोतं माहित नाही . आईला जन्माच्या
वेळी जीवच नव्हता म्हणे .. ती लगेच रडली नव्हती ., तर जमलेल्या आया बाया म्हणाल्या कि हे बाळ काही जीवंत नाही.
पण आईची आज्जी हि गोष्ट मानायला तयार नव्हती .., ती म्हणाली थांबा.., बेंबी उडत आहे पोरीची आणि तिने फुंकणीने
बाळाच्या कानात फुंकून तीन दिवस तिला तशीच तर्काडात ठेवले होते. तिच्या जन्माच्या वेळेपासूनच एक प्रकारे तिची परवड
सुरु झाली होती., ती अखेरपर्यंत जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या संदर्भात सुरूच राहिली.
तुझा जन्म एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात झाला. पण तुझ्या आईवडिलांनी तुम्हा पोरांना कधीच काही कमी पडू
दिलं नाही...आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानानं आणि मानानं जगण्याचे बाळकडू तुला तुझ्या लहानपणीच मिळालेलं...
तिच संस्कार शिदोरी घेऊन तू आयूष्यभर वाटचाल केलीस... माझे हि काहीतरी पुण्यं नक्कीच असतील...म्हणूनच तुझ्यापोटी
जन्म घेण्याचं मला भाग्य लाभलं ... आणि अर्थातच तुझ्या संस्कार शिदोरीचा वारसाही लाभला. आज मागे वळून पाहताना
जीव गलबलून जातोय ग ...!
माझ्या अगदी लहानपणापासून एक एक प्रसंग आठवला तरी असं वाटत राहतं की तू एक शिक्षिका असून देखील ,
अनेक अन्याय, अपमान, विवंचना झेलत होतीस…,साधे जीवन जगत होतीस. घरीदारी तुझ्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली ग
आई...पण तू कधीही त्याबद्दल चकार शब्दही काढला नाहीस. दादांच्या शिकवणीप्रमाणे आणि त्यांच्या फेट्याचा मान राखावा
म्हणून तू अत्यंत हालअपेष्टा सहन करत दिवस काढत होतीस. आम्हा चार भावंडांना कधीही तुझ्या दुःखाची झळ पोहोचू
दिली नाहीस. आम्ही जसजसे मोठे होत गेलो, तस तशी तुझ्या दुःखाची आम्हाला जाणीव होऊ लागली. आपलं घर म्हणजे
एक सुशिक्षित कुटुंब. परंतु इतर सुशिक्षित कुटुंबासारखा वातावरण आपल्या घरी आमच्या लहानपणी आम्ही कधीच अनुभवलं
नाही. सतत तणाव आणि दहशतीच्या वातावरणातच आम्ही लहानाचे मोठे झालो. तुझी ओढातान आम्ही बघत होतो.... एक
प्रतिष्ठित शिक्षिका असून देखील व्यक्तीस्वातंत्र्य, अर्थस्वातंत्र्य या गोष्टींना तू पारखी होतीस. पगार पत्रकावर सही करून तू
बाजूला व्हायचे. कोणत्याही निर्णयात तुला कधी सामावून घेतलं नाही. पण तरीही तू नेटाने आणि निगुतीने संसार केलास.
आमच्या शैक्षणिक गरजा , हवं - नको ,पाटी - पुस्तक पेन.- पेन्सिल हे सगळं-सगळं तू निभावून नेलंस... तुझ्याबद्दल लिहिताना
मला कोणालाही दोष नाही द्द्यायचाय... पण माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलीये ते आपोआपच माझ्या लेखणीतून
उतरत आहे...
मला आठवतंय सकाळी सगळ्यांची आवरायची घाई असायची ... आणि एका चुलीवर एवढ्या लोकांचा स्वयंपाक
आणि दहा ची शाळा गाठायची म्हणजे तुझी खूप कसरत व्हायची… सगळ्यांच आवरून, सगळ्यांचे डबे करून तू तशीच
घाईगडबडीत न जेवताच जायचीस... मराठी शाळा ते आपलं घर दीड-दोन किलोमीटरच अंतर... दुपारच्या सुट्टीत इतक
अंतर तुडवत ,फक्त जेवण्यासाठी येण्याच तू टाळायचीस.. तू कधी कधी यायची नाहीस. म्हणजे इतकं करूनही तुझ्या
पोटात वेळेवर चार घास नाही पडायचे.. शिवाय घरच्या लोकांचे टोमणे तर वेगळेच... मी तुला तेव्हाही अनेकदा विचारायचे...
तर तू म्हणायचीस बाळा तू अजून खूप लहान आहेस. तुला हळूहळू सगळं कळेल…. पण खरं सांगू का आई आम्ही लहान
होतो तेच ठीक होतं ग...आणि कळून तरी काय उपयोग...आम्ही तुझ्यासाठी काही करू शकत नव्हतो...फार तर तुला बिलगून
रडण्यापलीकडे आम्ही काही नाही केलं ग...!!
पण तू मोठी धीराची... आमच्यावर चांगले संस्कार केलेस. आपलं काम प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने, करण्याचे तू
लहानपणापासूनच आम्हाला तुझ्या कृतीतून दाखवून दिलस... तुझ्या आपार कष्टाचं , सचोटीच, बाळकडू निश्चितच आमच्या
आयुष्यात आम्हाला उपयोगी पडलं. कोणतीही गोष्ट न हारता, न थकता , प्रामाणिकपणे करत राहणे आणि ती पूर्णत्वास नेणे...
ही संस्कार शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरून उरेल ... आम्ही तुझा वसा असाच पुढे चालवू आई ...
आम्ही लहान असताना अनेकदा दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी
पेठेला जायचो. छोटंसं च घर होतं मामाचं पण आम्हाला तिथे जो जिव्हाळा , प्रेम , मिळायचं ते शब्दातीत आहे. माझी आज्जी
खूप कष्टाळू . खूप हालाकीत दिवस काढले तिने . पण मुलाबाळांचे संगोपन नेटकेपणाने केले.. ती कधीही खचली नाही.
अतिशय स्वाभिमानी होती माझी आज्जी ...आई ला तिने त्याकाळात शिकवले ...घरात अन्नाची वानवा असली तरी शाळेमध्ये,
शिक्षणामध्ये तिने कधी खंड पडू दिला नाही.
माझ्या आईला शाळेचे कपडे देखील नसायचे .., ती सातवी - आठवीत असताना आज्जीचे नऊवारी लुगडे
नेसून शाळेत जायची .. पण शिक्षणाची कास कधी घरच्या परिस्थितीमुळे सोडली नाही . वर्गातील मुले - मुली आज्जीबाई
आल्या असं चिडवायचे .. एक दिवस आईचे वर्गशिक्षक शंकर खंडू पाटील यांनी ते ऐकले .... आणि मग प्रत्येक वर्गात जाऊन
त्यांनी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या.. कोणाच्याही आर्थिक परिस्थितीवरून कोणी कोणाला चिडवू नये. आईच्या वर्गात आल्यावर
म्हणाले - तुम्ही समा पवारला चिडवू नका ... त्यापेक्षा तिची शिकण्यासाठीची जिद्द आणि तळमळ बघा... हि गोष्ट एक दिवस
दादांच्या कानावर गेली... आई शाळेमध्ये हुशार होती . तेव्हा तिचे स्कॉलरशिपचे ४५ रुपये आले होते. पण त्या पैशाला
अनमोल असे मोल होते. त्या काळात १२ रुपयात ६ वारी व १४ रुपयात ९ वारी साडी येत होती.. दादा म्हणाले ताय त्या
पैशातून तुला एक साडी आणि तिला एक लुगडं घेऊया. माम,आई आणि दादा तिघेजण खरेदीला गेले. दादांनीं मग आईला एक
उंच काठाची सहावारी साडी , आज्जीला नऊ वारी लुगडं आणि चोळखण आणले आणि मामाला पण पटक्याचा शर्ट शिवला.
अशा परिस्थितीमध्ये बालपण काढलेली माझी आई नेहमीच स्वाभिमानाने जगली... कधीही कोणापुढे हात पसरला नाही .
शंकर खंडू पाटील सरांसारख्या गुरुजनांचा संस्कार लाभलेली ती पिढी होती...अशी कच्ची कशी असेल ... आयुष्यात येणाऱ्या
प्रत्येक परिस्थितीला धीरगंभीरपणे तोंड देत वाटचाल करायची ... हा गुरुवासा जणू तिने संपूर्ण आयुष्यभर जपला ...!
आईने तिच्या लग्नाच्या वेळचा एक प्रसंग सांगितला .. जेव्हा पाहुणे मुलीला म्हणजे आईला बघायला आले तेव्हा
माझी आज्जी आणि आजोबा घरी नव्हते ., शेतावर कामाला गेले होते . शेजारी चुलत्यांच्या घरी आईला दाखवण्याचा कार्यक्रम
झाला. चारच दिवसात पाहुणे पुन्हा लग्नाची बोलणी करायला आले. तेव्हा दादांनी या स्थळास पसंती दाखवली नव्हती. पण
नेहमीप्रमाणे लोकांनी समजूत काढली , मुलगा चांगला आहे . मास्तर आहे ., सरकारी नोकरी आहे . तेव्हा दादांचा पण सगळ्यां
पुढे नाविलाज झाला. आणि आईचे लग्न झाले . एक दिवस आईचे मामा नाटोलीहून भेटायला आले. तर आईचा अवतार बघून
गहिवरले. एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक.,जनावरांची उपसाबर, शेण -घाण सगळं - सगळं आई करत होती. तेव्हा त्यांनी
माझ्या आजोबांना सांगितले . समा अभ्यासात हुशार आहे. तिला अशी घरात ठेऊ नका.माझ्या आजोबांना ते पटले.आणि मग
आईला ट्रेनींग कोर्स ला घातले. सांगलीला कस्तुरबाई वालचंद कॉलेज मध्ये तिने ट्रेनींग पूर्ण केले. आणि एस. एस. सी ट्रेंड
म्हणून प्राथमिक शिक्षिकेची तिची पहिली नेमणूक आजरा तालुक्यातील गजरगाव या गावी झाली. तिच्या आयुष्याचा दुसरा
अध्याय सुरु झाला होता. तोपर्यंत तिला मोठ्ठा मुलगा मेजर व मुलगी विजयश्रीला ही दोन अपत्य झाली होती. ताईला सोबत
घेऊन ती गाजरगावला हजर होण्यासाठी गेली. सोबतीला सासरे म्हणजे माझे आजोबा ज्यांना सगळेजण बाप्पा म्हणत ते गेले
होते. त्यावेळी मुलाला म्हणजे मेजरला सोबत दिले नव्हते तिच्या. आई सांगते खूप हुशार होता तो. म्हणून माझ्या आजीने त्याचे
नाव मेजर असे ठेवले होते. पण दुर्दैव ...या क्रूर काळाने लवकरच त्याला हिरावून नेले. तो आज असता तर कदाचित आमच्या
घरची परिस्थिती आज वेगळी असती... कदाचित मी नसते ही ... पण या झाल्या सगळ्या जर-तर च्या गोष्टी. विधीलिखित
कधी आजपर्यंत कोणाला टाळता आले आहे का... ?
मी साधारण पाचेक वर्षांची असेन तेंव्हा माझ्या मोठया ताईचे म्हणजे विजयश्रीचे लग्न झाले. दोन नंबर ची बहीण सविता,
भाऊ माणिक अशी आम्ही चार भावंडं . दोघी बहिणींना सगळेजण सजाआक्का - विजाआक्का असेच संबोधत असत. मोठया
ताईचे लग्न तसे खूप लवकरच झाले. त्यामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला. तिने सासरी ११ वी केली पण पहिले मुल लवकर
झाल्यामुळे मुलाबाळांच्या व्यापात तिचं शिक्षण मागे पडलं. ती संसारात रमून गेली. सुजाताईला आईने सायन्स साईडला
घातले. तिचे ऍडमिशन कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगलीला घेतले. तिला तिथेच कॉलेजच्या होस्टेलवर ठेवले. तिला डॉक्टर
करायचे असे आईचे स्वप्न होते. तिला मार्क्स हि चांगले होते परंतु थोड्या डोनेशनसाठी अण्णांनी आढेवेढे घेतले आणि आईचे
स्वप्न अधुरेच राहीले. तिने पुढे त्याच कॉलेजमध्ये बी.एस.सी. पूर्ण केले . टी वाय ला असताना तिचे हि लग्न झाले. आईची तेव्हा
ढवळी या आमच्या गावाशेजारील गावात बदली झाली होती. बागणीपासून साधारण ४ - ५ किलोमीटर अंतरावर ढवळी हे
छोटंसं गाव .जाण्या - येण्यासाठी त्या गावाला त्यावेळी एस टी हि नव्हती.माझी माउली तेवढं अंतर रोज चालत पार करत होती.
शेवटी गावकऱ्यांनी सभापतीला अर्ज करून एस टी सुरु केली. आज जी बहादूरवाडी गाडी मधल्या मार्गे म्हणजे आष्टा -
बागणी - ढवळी - कोरेगाव - बहादूरवाडी चालू आहे., ती माझ्या आईच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. कित्येकांना हि गोष्टं
माहितीदेखील नसेल. असा माझ्या आईचा जीवनप्रवास .,कष्टदायी असला तरी तितकाच प्रेरणादायी आहे....!!
मला आज हि एक एक प्रसंग अगदी लख्ख आठवतोय... १९९० साली आईच्या मणक्याचे ऑपरेशन सांगलीला
म्हैसाळकर शिंदे हॉस्पटलमध्ये झाले. त्यावेळी माझी पोतल्याची यमुना मावशी ने आईची खूप सेवा केली . पण त्या वेळेपासून
आईच्या मागे दवाखाना लागला तो अगदी शेवटपर्यंत... आईचे ऑपरेशन झाल्यामुळे तिची होणारी मानसिक, शारीरिक
आणि आर्थिक कुचंबना आम्ही बघत होतो. तिने या अवघड प्रसंगावर पण धीराने मात केली . मी ९वी - १० वीत असल्या
पासूनच या मोठ्या प्रसंगांना सामोरी गेल्यामुळे एकप्रकारे जबाबदारीची जाणीव आली होती.आइचे झालेलं ऑपरेशन आणि
ताईच लग्न यामुळे आर्थिक तंगीचा विचार करून मी १० वी नंतर कलाशाखेत आष्टा कॉलेज ला प्रवेश घ्यायचे ठरविले. दरम्यान
आईची बदली पुन्हा बांबवडे या गावी झाली. तिला रोज येऊन - जाऊन करणे शक्य नव्हते. आणि तिच्याशिवाय बागणीत
एकटीने राहून कॉलेज करणे मला शक्य नव्हते. म्हणून तिने मला बी.ए ला सांगलीला कस्तुरबाई वालचंद कॉलेजला घातले.
माझे हि हॉस्टेल लाईफ चालू झाले. होस्टेलच्या मेस मधील जेवणामुळे आईच्या हातच्या जेवणाची किंमत कळली ...पण ती
रविवारी भेटायला येताना डबा घेऊन यायची. माझ्या मैत्रिणी अगदी तुटून पडायच्या जेवणावर...वाट बघत असायच्या त्या
रविवारची... आईला माझ्याबद्दल एक वेगळाच आत्मविश्वास होता. मी ही अभ्यासात हुशार होते. ग्रॅजुएशनला अर्थशात्र विषय
घेतला होता. मला ६४ टक्के मार्क्स मिळाले. फर्स्ट क्लास ने पदवीपरीक्षा उत्तीर्ण झाले. दिक्षांत समारंभाला पहिल्यांदाच
शिवाजी विद्यापीठात गेले होते. तिथले वातावरण बघून भारावून गेले. ज्या दिवशी डिग्री सर्टिफिकेट घेऊन आले, त्या दिवशी
तिचा जीव आभाळाएवढा झाला. मला म्हणाली तू काहीतरी करून दाखवशील. तुला किती शिकायचं तेवढं शिक ... मला ते
सगळं जसं च्या तसं आता शब्दात मांडता येईना पण एक कृतार्थता तिच्या नजरेतून ओसंडून वाहत होती. मी तिला म्हणाले -
आई मला पदव्युत्तर शिक्षण विद्यापीठात घ्यायची ईच्छा आहे. तिने मला लगेच होकार दिला . विद्यापीठात ऍडमिशन घेण्या
पासून ते होस्टलवर शिफ्ट होईपर्यंत सगळं काही मी एकटीने केले.आणि ते मी करू शकते हा आत्मविश्वास तिनेच माझ्यात
ओतप्रत भरला होता. मला आज हि मागे वळून बघताना या सगळ्या गोष्टींचे खूप आश्चर्य वाटते. कसं आपण त्यावेळी हे सगळं
निभावून नेलं याचा विचार करताना आईचे कष्ट, सचोटी, जिद्द , प्रामाणिकपणा , ठामपणा हि सगळी संस्कार शिदोरी
आपल्यासोबत असल्याचा अनुभव आज हि पावलोपावली येतो...
दरम्यानच्या काळात आईला प्रमोशन मिळाले. वरिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून तिची आष्टा शाळा नंबर ७ ला बदली
झाली. खूप आनंद झाला. मधल्या काळात अनेक गोष्टी घडून गेल्या होत्या. २००० साली तिचे मणक्याचे पुन्हा दुसरे ऑपरेशन
झाले. तेव्हापासून ती शारीरिकदृष्ट्या थोडी कमकुवत झाली होती. वॉकर वरच चालत होती. एक मोठा हार्टअटॅक हि येऊन
गेला होता. तेव्हाची परिस्थिती हि अशीच भयानक होती. सांगलीला वासवाडे डॉक्टरांच्या आधार हॉस्पिटलच्या आय. सी. यू.
ला ऍडमिट केले होते तिला . डॉक्टरांनी फक्त ४८ तासांची मुदत दिली होती . पण तिच्या वरचा हा आघात सर्वांच्या प्रार्थनेने
टाळला होता. तिची जगण्याची उमेद आणि खंबीरपणापुढे काळ ही हरला होता. तिच्याकडे पाहून नेहमीच असे वाटायचे कि
प्रत्येक परिस्थितीला इतकं धीरगंभीरपणे लढण्याचे बळ हिला कुठून मिळतं ....खूप प्रेरणादायी होती माझी आई. तिच्याकडे
बघून मरणाराला पण जगण्याची नवी उमेद मिळेल असंच तिचं एकूण व्यक्तिमत्व होतं. जवळजवळ २० वर्षापासून ती वॉकर
वर होती. आपल्यासारखं जमिनीवर मांडी घालून बसता येत नव्हता तिला. तिचे सगळे व्यवहार खुर्चीवर बसूनच करायची ती.
पण त्या हि अवस्थेत ती सगळी कामं स्वतः करायची. तिच्याकडे पाहून कोणाही हातीपायी धड असलेल्या माणसाला लाज
वाटेल, अशा सगळ्या दैनंदिन गोष्टी ती सफाईदारपणे करायची. पण शेवटी तिने प्रकुर्ती अस्वास्थ्यामुळे २००२ साली स्वेच्छा
निवृत्ती घेतली. मी तेव्हा तिच्या निरोप समारंभाला गेले होते. तिच्याविषयी लोक इतकं भरभरून बोलत होते कि स्वाभिमानाने
ऊर भरून आला होता.आई जेव्हा बोलायला उभी राहिली तेंव्हा इतकी गहिवरली होती की उपस्थितांचे डोळे सुद्धा पाणावले
होते. अतिशय कष्टाने तिने स्वतःचे असे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते त्याचा गौरवदिन होता तो... खूप कमी वेळात तिने
शाळा नंबर ७ चा चेहरा मोहराच बदलून टाकला होता. तिच्या कारकिर्दीत तिने संपूर्ण शाळा ऑइलपेंटने रंगवून घेतली होती.
एक आदर्श शिक्षिका होती माझी आई. शरीराने साथ दिली असती तर सर्व प्रमोशन घ्यायची तिची उमेद होती. पण दोन वर्षे
आधीच तिने वरिष्ठ मुख्याध्यापिका या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली...खरोखरच खूप वेगळी होती माझी आई... आणि तिचे
हे वेगळपण तिने शेवटपर्यंत जपलं...!!
माझ्यासाठी तर ती माझं सर्वस्व होती. अगदी दीपस्तंभासारखी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. मला
म्हणाली आता तुझं एम. ए. झाले आहे. तुला मोठ्ठी प्राध्यापक झालेलं मला बघायचं आहे. आणि २००३ साली मला बी. एड. ला
ऍडमिशन घेतले. मी बी. एड. नंतर एक वर्ष गावाजवळच असलेल्या वडगावच्या बाळासाहेब माने जुनिअर कॉलेज मध्ये
जॉब केला. २००५ साली मी एम.एड. ला ऍडमिशन घेतले. पुन्हा शिवाजी विद्यापीठातील प्रथितयश शिक्षणशास्त्र विभागामध्ये
शिकण्याची मला संधी मिळाली. माझं भाग्य खरंच मोठ्ठ म्हणून मला आईसारखी गुरु लाभली... मी रिकामं असलेलं तिला
आवडत नसे. काही ना काही करत राहण्यासाठी ती मला सतत प्रेरणा द्यायची...
२००५ - ०६ साली एम. एड. ला असतानाचा एक प्रसंग सांगते. त्याशिवाय माझ्या असण्याला खरंच अर्थ नाही. आज
जी काही मी आहे... ती फक्त आणि फक्त तिच्यामुळेच आहे... एप्रिल च्या फर्स्ट वीक मध्ये आमची वार्षिक परीक्षा संपली. मी
होस्टेलवरून सर्व सामान घेऊन घरी आले. २० मे २००६ ला माझा रीजल्ट हि आला.. मला ७०.३0 टक्के मार्क्स मिळाले. मी
खूप खुश होते. मला हाय्य्यर फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या एक वर्षात आमचा जणु पुनर्जन्म झाला होता. जगण्यातील
समृद्धता त्या एका वर्षातील ज्ञानसाधनेत व्हावी इतकी सखोलता या पदव्युत्तर शिक्षणात होती. माझ्या सर्व गुरुवर्यांना माझा
कृतज्ञतापूर्वक नमस्कार.. आणि मनःपूर्वक धन्यवाद.. ☺🙏🏻आई लक्ष्मीच्या पायावर माथा टेकून आणि पेढे घेऊन मी हर्षो -
-उल्हासातच घरी आले. आईचा आनंद गगनात मावेना ... खूप खूश होती ती...मे - जून असाच आनंदात गेला. मी सेट परीक्षेचा
फॉर्म भरला होता.,पण अभ्यास करत नव्हते. घरी आल्यापासून खूप रिलॅक्स होते. त्या साली पाऊस हि खूप होता. नद्यांना पूर
आला होता. जुलै-ऑगस्ट मध्ये तर महापुरामुळे सांगली - कोल्हापूरची एस. टी. वाहतूक ही कोलमडली होती. १३ ऑगस्ट ला
सेट परीक्षा होती. माझा नंबर राजाराम कॉलेज ला आला होता. पण पंचगंगेलाही पूर आला होता. वडगावला वारणा नदीवर ही
पुराचे पाणी वाढू लागले होते. इतक्या मुसळधार पावसात बाहेर पडणं मुश्किल होतं ..पण आई म्हणाली परिक्षेदिवशी वेळेत
पोहचणं गरजेच आहे. तू एक दिवस आधीच जा., होस्टेलवर राहा आणि परीक्षा देऊन ये. मी तर परीक्षेला जायचं जवळजवळ
कैन्सलच केले होतं. मी तसं तिला सांगितलं - म्हणाले माझा अभ्यास ही नाही म्हणावा तसा..मी पुढच्या वेळी देते ही परीक्षा.
पण ती म्हणाली नाही .. अशी परीक्षा बुडवायची नाही. आणि तुला सगळं येतंय.., तू फक्त पेपर देऊन ये. दुसऱ्याच दिवशी
वडगावच्या पुलावर पाणी आले म्हणून एस. टी. बंद होणार अशी बातमी आली. तिने माझं काहीही न एकता मला परीक्षेला
पाठवलंच.., आणि तो दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला... मी होस्टेलवर एक दिवस गेस्ट चार्ज देऊन राहिले.
दुसऱ्या दिवशी प्रसन्न मनाने आणि वेळेत परीक्षा सेंटरवर पोहोचले. पेपर एकदम छान गेला. कसं कोण जाणे आईच्या आणि
देवी सरस्वतीच्या आशीर्वादामुळे माझी लेखणी झरझरझर चालत होती.
दरम्यान डिपार्टमेंटला असताना कॅम्पस इंटरव्ह्यू झाल्या होत्या. त्यात माझे सिलेक्शन सिंहगड इन्स्टिट्यूट ला झाले.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सिंहगड इन्स्टिट्यूट वरुन कमीटी सिलेक्शन साठी पुन्हा इंरव्यूहचे लेटर आले. माझी पहिली
पोस्टिंग रांजणगावच्या जवळ असणाऱ्या कोंढापुरी या गावी बी. एड. कॉलेजवर झाली. आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज
झाल्यासाखं वाटले. आईचा आनंद तर शब्दातीत होता. खूप कौतुक आणि कृतार्थता होती तिच्या नजरेत. खूप दूर आहे म्हणून
यावेळी पहिल्यांदा अण्णा मला कोंढापुरीला सोडायला आले. ६ नोव्हेम्बर २००६ रोजी मी लेक्चरवर असतानामला डिपार्टमेंट
वरून फोन आला. मी तो घेतला तर समोरून येवले मॅडम बोलत होत्या..मला धक्काच बसला.. मॅम म्हणाल्या अरुणा तुझं
मनःपूर्वक अभिनंदन ... 💐💐 तू सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहेस...माझा माझ्या कानावर विश्वासच बसेना...पहिल्याच
प्रयत्नात मी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले होते..खूप - खूप आनंद झाला... जितका आनंद सेट क्लिअर झाल्याचा झाला त्यापेक्षा कैक
पटीने येवले मॅडम यांचा फोन आल्याचा झाला. दुसऱ्या स्टाफ मेम्बरने ही नेटवर रिजल्ट पहिला होता. त्यांचा हि अभिनंदनाचा
फोन आला... माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यादिवशी कॉलेजने भलामोठ्ठा गुलाबांच्या फुलांचा बुके देऊन माझा
सत्कार केला. आईचा सल्ला त्या दिवशी ऐकल्याचे सार्थक झाले.. किती अढळ विश्वास होता आईचा माझ्यावर.... आणि किती
दूरदृष्टी ... आज मागे वळून बघताना वाटते कि जर मी तिचे तेव्हा ऐकले नसते तर... कदाचित आज जिथं मी आहे तिथंपर्यंत
पोहोचू शकले असते का...अशी माझी आई - ठाम, खंबीर, निश्चययी ...तिच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला माझा सलाम...!! 🙏🏻🙏🏻
त्या नंतर माझ्या करिअरची घोडदौड अशीच सुरु राहिली. डिसेम्बर मध्ये मी सोलापूर विद्यापीठातील शिक्षणशास्त्र
विभागाच्या अधिव्याख्याता पदाची इंटरव्यूव्ह दिली. मी पहिल्यांदाच विद्यापीठीय लेव्हल च्या मुलाखतीला सामोरी जाणार
होते. तिथे कुलगुरूंच्या केबिनमध्ये रजिस्ट्रार सहित एकूण ११ लोक होते. माझी मुलाखत छान झाली. तिथे हि माझे सिलेक्शन
झाले. मी सिंहगड सोडून सोलापूर विद्यापीठ जॉईन करायचा निर्णय घेतला. एम.एड. नंतर लगेचच पदव्युत्तर विभागात चान्स
मिळणे हि माझ्यासाठी पर्वणी होती. त्यावेळी मी माझ्यासोबत आईला नेले होते. रिटायरमेंट घेतल्यापासून एका जागी बसून
ती कंटाळली होती. कुठे जाणे नाही कि येणे नाही... एक छोटेखानी बंगलो भाड्याने घेऊन आम्ही माय-लेकी तिथे मस्त राहत
होतो. अकॅडमिक इअरची ऑर्डर होती., पण फार भारी वाटत होतं . आईच स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान वाटत होतं ...!!
माझे तिथले रुटीन डिसेम्बर ते मार्च पर्यंत अगदी छान चालू होते. पण तेथील उन्हाळा काही आईला पेलला नाही.
सोलापूर म्हणजे शोलापूरच... खूप उष्णता... त्या सन स्ट्रोक्सचा एक तीला दिवस खूप त्रास झाला. मी डिपार्टमेंटहून आले तर
ही अगदी घामाने चिंब भिजून निपचित पडली होती. मी तिथे एकटीच घाबरू गेले. पण तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप
सहकार्य केले. घरी डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासल्यावर म्हणाले - घाबरू नका. सन स्ट्रोक मुळे यांना त्रास झाला आहे.
त्यांना इथलं वातावरण सूट नाही झालं. एप्रिल - मे मध्ये तर उष्णतेचा कहरच असतो तिकडे... स्किन अगदी करपून जाईल
इतका... मग आईला पुन्हा घरी सोडायचा मी निर्णय घेतला . माझ्या विद्यार्थ्यांनीच एक ओळखीतील गाडी ठरवून दिली.
आणि मी आईला पुन्हा घरी - बागणीला सोडून आले. थोडा काळ का असेना तिला माझ्याबरोबर बाहेर पडता आले. खूप
समाधानानी आणि निवांतपणे राहिली होती ती तेव्हा... अकॅडमिक इयर संपले. ३० जून पर्यंतची ऑर्डर होती. मी सुट्टीला
घरी आले. तेव्हा आई म्हणाली बाळा तो आपला प्रांत नव्हे. तुझी ही तब्बेत नाजूक आहे. तू पण आता सोलापूरला नको
जाऊस. आपल्या भागात सातारा - पुणे इकडे कुठेही तुला छान संधी मिळतील. मी ही आईचे ऐकले आणि पुन्हा डिपार्टमेंटचे
कंटुनिएशन नाही घेतले... माझा मोर्चा पुन्हा पुण्याला वळला. तिथे मोझे बी. एड. कॉलेजला दोन वर्षे काम केले. त्या काळात
मी पुणे युनिव्हर्सिटी मधून मराठी विषयातून एम. ए. ला एक्सटर्नल ऍडमिशन घेतले. फर्स्ट क्लासने एम. ए. मराठी उत्तीर्ण
झाले. आता माझ्याकडे तीन - तीन पदव्युत्तर पदव्या होत्या. आईच्या दूरदृष्टीमुळे आणि तिच्याच न हरता.., न थकता..,
अखंडपणे आपले काम प्रामाणिकपणे करत राहण्याच्या संस्कारामुळे मी हे यश मिळवू शकले. तिच्या प्रेरणेमुळेच मी
ज्ञान आणि अनुभवसमृध्द होत होते. कुठं हि टाकलं तरी नाणं खणखणीतच वाजणार इतकी माझी फाईल एकदम
खणखणीत झाली होती. आई मला नेहमी म्हणत असे - तुला प्रत्येक ठिकाणाहून नोकरीसाठी समोरून बोलावणे येणार...
आणि माझ्या माउलीचे ते शब्द खरंच ब्रम्हवाक्य ठरले. आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत ज्या - ज्या ठिकाणी मी नोकरी
केली तिथून खरंच मला पहिल्यांदा कॉल येत असंत - मॅडम तुम्ही आमच्या कॉलेजला जॉईन व्हाल का...? मला फार भारी
वाटायचं तेंव्हा... तिच्यातील या अगम्य आशावादाला माझा शतशः प्रणाम...!! 🙏🏻🙏🏻
मी, २००९ साली सिंहगडच्या लोणावळा कॅम्पसला जॉईन झाले. त्याच कालावधीत माझे लग्न हि झाले. मी पनवेलला
स्थायिक झाले. पनवेल टू लोणावळा माझे रोजचे अप - डाऊन चालू झाले. कॉलेजची फॅकल्टी बस होती तीन - चार वर्षे
एकदम लॅविश गेली... मी तत्त्वज्ञान आणि मानसशात्र हे दोन माझ्या आवडीचे विषय शिकवीत होते. जोडीला अर्थशास्त्र आणि
मराठी या दोन अध्यापन पद्धती होत्याच. बऱ्याचदा आईचा लेक्चर चालू असताना फोन यायचा. तिला मी एकदा सांगितले की
असं लेक्चर चालू असताना फोन नको करत जाऊ., मी तुला निवांत संध्याकाळी फोन करेन. तर ती म्हणायची नाही, मला तू
असं भरभरून बोलताना ऐकायचं आहे. तू फक्त फोन रिसिव्ह करून चालूच ठेव. तू बोलत असताना मला असं तास न तास
ऐकत राहावं वाटतं... आणि ती खरंच माझं व्याख्यान फोनवर ऐकत राहायची ... अशी माझी आई शिक्षणावर तिची एक
अढळ श्रद्धा होती. आणि तिची ती श्रद्धाच.., आशीर्वादरूपाने नेहमीच माझ्या जीवनात मला अखंडपणे मिळाली. व मिळत
राहील असा माझा ठाम विश्वास आहे....
मध्यन्तरीच्या कालावधीत बी. एड. कॉलेजेसची संख्या प्रचंड वाढल्यामुळे विद्यार्थिसंख्या खूप रोढावली होती. त्यामुळे
महाराष्ट्रातील अनेक कॉलेज बंद पडले होते. त्यामध्ये सिंहगढ ने ही आपल्या ८ ही कॅम्पस मधली एस. एन. डी. टी. अंतर्गत
असणारी सर्व बी. एड. कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी त्यांनी तीन महिने आधी आम्हाला नोटीस हि दिली. आणि ३०
एप्रिल २०१२ रोजी आम्ही कार्यमुक्त झालो. एका सुंदर स्वप्नाला द्रुष्ट लागल्यासारखे झाले. सैरभैर झालो आम्ही सर्व... काही
सुचतच नव्हते. मी एकटीच नव्हे तर एका दमात ६४ क्वालिफाईड प्राध्यापक एका क्षणात बेरोजगार झाले. शिक्षणासारख्या
पवित्र पेशातील शिक्षकांची इतकी मोठी प्रतारणा आम्ही याची देही याची डोळा अनुभवली. त्या कालावधीत जे दाम्पत्य दोघेही
त्याच संस्थेत कार्यरत होते. त्यांचे फार हाल झाले. अनेक लोकांचे संसार अक्षरश: वाऱ्यावर उघडे पडले. मधेच करिअरला
ब्रेक लागणार म्हणून आम्ही सगळेच भांबावून गेलो होतो. इतक्या वर्षांची तपश्चर्या ... खूप कष्टाने मिळवलेले नाव - यश याला
काहीच अर्थ नाही का...? खूप निराश व्हायला झालं होतं तेंव्हा... पण नेहमीप्रमाणे तेव्हा ही आईने मनाला खूप उभारी दिली.
म्हणाली - थोडा ब्रेक मिळाला आहे तर एवढं निराश व्हायला काय झालं... खूप धावपळ केलीस आत्तापर्यंत थोडी विश्रांती
मिळाली असं समज.. मुलीला ही वेळ देता येईल. तिच्या संगोपनासाठी वेळ मिळालाय असं समज... अशी समजूत काढत
होती ती माझी. तेंव्हा माझी गार्गी दीडेक वर्षांची होती. मी तिला पाळणाघरात ठेवत होते. मग मी ही जास्त विचार न करता
येईल त्या प्रसंगाला धीराने सामोरी गेले. किंबहुना आजतागायत तेच करत आले होते. माझी आई मला म्हणायची खूप धीराची
बाळ आहे माझी... क्या बडा - तो दम बडा असं म्हणून ती माझा धीर आणि उमेद वाढवीत होती. अशी प्रेरणादायी माऊली
लाभण्याचे भाग्य सगळ्यांच्या भाळी नसते, ते भाग्य मला लाभले म्हणून मी ईश्वराची शतशः आभारी आहे... 🙏🏻🙏🏻
शिक्षण कधीच वाया जात नाही. तुम्ही एखादी गोष्ट सहज म्हणून शिकला असलात तरी - ती, कधी आणि कशी
तुम्हाला उपयोगी पडेल सांगता येत नाही. अगदी असाच अनुभव पुन्हा एकदा आला. आणि आईचे आशीर्वादरूपी ब्रम्हवाक्य
पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. जरी सिंहगड संस्थेने एस. एन. डी. टी.अंतर्गत असणारी सर्व बी. एड. कॉलेज बंद केली
असली तरी पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत असणाऱ्या सर्व तुकड्या चालू होत्या. आणि ज्या संस्थेने कार्यमुक्ती दिली होती त्यांनीच
पुन्हा मला २०१३ च्या जुलै मध्ये मराठी मेथडसाठी बोलावून घेतले. माझी ईच्छा नव्हती पुन्हा जॉईन व्हायची. पण आईने
नेहमी प्रमाणे समजूत काढली .. अग एवढे समोरून बोलावतायत तर कशाला नाही म्हणतेस. तेव्हा माझी मैत्रेयी अवघी ६
महीन्याची होती.. खूप आढेवेढे घेत मी जॉईन केले पण पूर्वीचे वातावरण आणि आत्ताचे वातावरण यामध्ये जमीन - आस्मान चे
अंतर आले होते संस्थेत. पूर्वीची पॉसिटीव्ह एनर्जी आता जाणवत नव्हती. पगार ही वेळेवर होत नव्हते. एकेकाळी सिक्स पे
घेणारे आम्ही आता बेसिक वर आणून ठेवले होते. आणि ते हि सहा - सहा महिने मिळत नव्हते. या सगळ्याला मी कंटाळले ...
विचार केला एवढी धावपळ करून, लहान मुलींचे हाल करण्यात काय अर्थ आहे. आणि शेवटी मी सिहंगडला राजीनामा दिला.
थोडे दिवस घरात असं रिकामं बसणं खूप जड जात होतं मला.,पण गार्गी - मैत्रयी मध्ये छान वेळ जात होता. आणि त्यावेळी तो
त्यांच्या हक्काचा वेळ होता. हळू-हळू मुली मोठ्या होत होत्या. गार्गी ला स्कूल ला ऍडमिशन घेतले होते. दोघींच्या विश्वात मी
छान रमले होते...माझ्या संसार वेलीवर दोन सुंदर कळ्या फुलल्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये रमलेल्या मला बघून आईला
कृतार्थ वाटत होते. पण बसल्या बसल्या काहीतरी कर.., लिहीत जा असं ती मला सुचवत असे. मला ही असं रिकामं बसणं
आवडत नव्हतं पण चांगल्या ठिकाणी ऑफर आल्याशिवाय कुठं ही जॉईन व्हायचं नाही असं मी ठरवून टाकलं होतं. तेव्हाच
डोक्यात विचार आला आपण पीएच. डी. करूया. हाताशी वेळ असल्यामुळे आणि कष्टाळू वृत्ती असल्यामुळे मी माहिती
घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी काय प्रोसिजर आहे, याची चौकशी करण्यासाठी मी मुंबई विद्यापीठातील शिक्षणशास्त्र
विभागामध्ये गेले. पहिल्यांदाच मी मुंबई विद्यापीठामध्ये गेले होते. अशा प्रतिष्ठित., नामांकित विद्यापीठात शिक्षण घ्यायला
मिळणे हे कोणालाही स्वप्नवतच वाटेल. आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला हि मिळाली. बागणी सारख्या एका
छोट्याशा गावातील मी, आज एवढा मोठ्ठा टप्पा गाठेन असं मला स्वतःलाही कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण म्हणतात
न - आकांक्षापुढती गगन ठेंगणे... एका माऊलीच्या आशिर्वादात, शब्दात किती ताकत असते याचा मी पालोपावली अनुभव
घेत होते..!
ना कधी थांबायचे..., ना कुठे थबकायचे..., क्षितिजा पल्याड जायचे...
मज क्षितिजा पल्याड जायचे...!!
२०१४ च्या जुलै महिन्यात पीएच. डी. साठी इंटरव्हयू झाल्या. मला आठवतंय एकादशीचा दिवस होता तो. जवळ
जवळ शंभरएक कॅन्डीडेट होते. तिथले वातावरण बघून जराशी घाबरलेच. पण म्हंटल नेमकी काय प्रोसिजर आहे समजावून
घेण्यासाठी थांबणं गरजेचं आहे. मुलाखतीसाठी काही वेगळी तयारी केली नव्हती. मला तशी काहीच कल्पना नव्हती.
माझा नंबरआल्यावर केबिनमध्ये गेले. समोर एक्सपर्टस चे पॅनल होते. प्राथमिक माहिती विचारल्यावर त्यांनी मला संशोधनाशी
निगडित प्रश्न विचारले. माझ्या एम. एड. च्या डेजरटेशनवर आधारीत प्रश्नोत्तरे झाली. मला जे येत होते ते मी आत्मविश्वासपूर्वक
सांगितले. माझी मुलाखत झाली. मी सर्व पॅनल ला नमस्कार करून बाहेर आले. मनातून वाटत होते. एवढ्या १०० स्कॉलर
विद्यार्थ्यांमधून कुठला आपला चान्स लागतोय.. पण किमान प्रोसिजर समजल्याच समाधान मनात घेऊन मी तेथून बाहेर पडले.
आणि ऑगस्टच्या ८ तारखेला मला डिपार्टमेंटमधून फोन आला. तुमचं पीएच. डी.साठी सिलेक्शन झालं आहे. तुम्ही ऍडमिशन
च्या पुढील प्रोसिजरसाठी डिपार्टमेंटला या... मला क्षणभर कानावर विश्वासच बसला नाही. दुसऱ्याच दिवशी मी डिपार्टमेंटला
पोहचले. काच फलकात सिलेक्टड विद्यार्थ्यंच्या नावाची लीस्ट लावली होती. एकूण आठ विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले होते. आणि
त्यांच्या नावापुढे अलॉटेड गाईड्सची नावे होती. मी पुनःपुन्हा माझं नाव वाचत होते. माझ्या नावापुढे डॉ. रमा भोसले मॅडमचे
नाव होते. आता मात्र खरंच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना.. खूप-खूप आनंद झाला... माझ्यासाठी तो एक दुग्ध-शर्करा
योग होता... पुन्हा एकदा मला आईच्या दुर्दम्य आशावादाचे व आशीर्वादाचे दर्शन झाले. मी संध्याकाळी आईला फोन केला...
आई मला पीएच. डी. ला ऍडमिशन मिळाले. तिचा तो आनंद मी शब्दात नाही व्यक्त करू शकत...किती आनंद.... किती
कौतुक....आणि किती सार्थकता छलकत होती तिच्या बोलण्यातून ... खूप - खूप सुखावली ती... कारण तिचं स्वप्न आता पूर्ण
होणार होतं...ताईला डॉक्टर करायचे तिचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पूर्ण होणार होतं..तिने आजपर्यंत आमच्यासाठी घेतलेल्या
कष्टाचे सार्थक होण्याचा तो क्षण होता.. तिच्याही मुलीच्या नावापुढे आता डॉक्टर उपाधी लागणार होती... खूप आनंदाने आणि
कौतुकाने ती सगळ्यांना सांगत होती. माझी अरु डॉक्टरेट करतीये - मुंबई विद्यापीठात... खरंच माझी आई खूप वेगळी होती .
एक अनोखी दुर्दम्य इच्छाशक्ती होती तिच्यामध्ये...
माझ्या आयुष्यातील दुसरा अध्याय चालू झाला. मॅडमना भेटून माझं पुढील कामकाज चालू झालं . संशोधनाचा विषय
ठरला ... प्रपोजल तयार करायला घेतलं ... मुलींना सांभाळत - सांभाळत मी प्रोपोजल तयार केले. चार महिन्यांचा कालावधी
लागला प्रपोजल फायनल व्हायला. नोव्हेम्बरच्या शेवटच्या आठवड्यात २९ तारखेला मी ते विद्यापीठास सादर केले. त्याच
कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे. (बार्टी) कडून पपेरला जाहिरात आली होती.
डॉ. बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेट केल्याच्या ऐतिहासिक घटनेस १०१ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ त्यांनी
१०१ विध्यार्थ्यांना नॅशनल स्कॉलरशिप जाहीर केली होती. मी बारकाईने ती जाहिरात वाचली. खूप अटी आणि शर्थी होत्या. पण
माझ्या स्वभाव धर्माप्रमाणे मी समोर आलेली कोणतीही संधी सोडत नव्हते. माझं प्रपोजल रेडीचं होते. सहज ट्राय मारायचा
म्हणून मी तिकडे हि प्रपोजल पाठविले. नॅशनल स्कॉलरशिप आहे म्हणजे संपूर्ण देशातून विध्यार्थी असणार याची कल्पना होती.
परंतु आपण प्रयत्नच केला नाही असे नंतर वाटून काय उपयोग ..? म्हणून मी समोरची कोणतीच शैक्षणिक संधी कधीच सोडत
नव्हते. यश - अपयशाचा मी कधी विचार केलं नाही .
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ..! या उक्तीप्रमाणे मी सदैव कार्यतर होते. आपले काम प्रामाणिकपणे ..,
न हारता ..,न थकता करत राहणे आणि पूर्णत्वास नेणे हे आईचे संस्कार पदोपदी यशाच्या आणखी जवळ नेत होते. बार्टी कडून
ही मुलाखतीच्या फेऱ्या चालू झाल्या. जवळपास साडेपाच - सहा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. आणि त्यातून फक्त १०१
विद्यार्थ्यांची निवड होणार होती. खूप टफ कॉम्पिटिशन होती. जानेवारी ते एप्रिल अखेर मुलाखतीचे राउंड चालले. एकूण तीन
फेऱ्यांची चाळण होती. पहिल्या दोन फेऱ्या मी यशस्वीरीत्या पार केल्या होत्या. माझी तिसऱ्या फेरीची मुलाखत १० एप्रिल रोजी
होती. नेहमीप्रमाणे मी प्रसन्न मानाने आईला मनोमन वंदन करून सकाळी १० वाजताच पुण्याला पोहचले. आता फक्त
सिलेक्टड कॅन्डीडेट होते. व आज खरा कस लागणार होता..पण ज्यांच्या पाठीशी आईचे आशीर्वाद आणि खुद्द देवी सरस्वतीचा
वरदहस्त असतो.., त्यांना काळजी करायचं कारणच नाही. माझी ती ही मुलाखत उत्कृष्ठ झाली.., माझा संशोधनाचा विषयच
इतका वेगळा आणि नाविन्यपूर्ण होता,की प्रत्येक पॅनलला तो खूप आवडायचा. सिलेक्टेड कॅन्डीडेटची फायनल लीस्ट बार्टीच्या
पोर्टलवर झळकली. सर्वच विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची कॉमन लीस्ट होती ती. जीव मुठीत धरून मी एकेक नाव वाचत होते.
शिक्षणशात्र विद्याशाखेपर्यंत आले. आणि माझ्या संयमाचा बांध फुटला. शिक्षणशास्त्रातील एकूण सहा च विद्यार्थ्यांचे सिलेक्शन
झाले होते... आणि त्यात माझे नाव टॉप ला होते. शेवटी मी बाजी मारलीच. माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत शिरपेचातील
मनाचा तुरा शोभावा असा तो क्षण होता... माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळ वाहू लागले. तात्काळ आईला फोन करून
ही आनंदाची बातमी दिली... त्या माऊलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आम्ही दोघीही त्यादिवशी आनंद अश्रूंनी न्हाऊन
निघालो. कारण ज्या महामानवाने आपले संपूर्ण जीवन आपल्या जनतेच्या कल्ल्याणासाठी ., समाज आणि देशहितासाठी
वेचले होते त्यांच्या नावाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळणे म्हणजे गौरवास्पद होते. आणि हा गौरव आईला मिळवून देण्याचं भाग्य
मला लाभले.... म्हणून त्या विधात्याचे शतशः आभार...
हळूहळू माझं संशोधनकार्य गती घेत होतं... आई मला सारखं विचारत होती कधी पूर्ण होईल ग तुझी डिग्री... तेवढं
बघून मी डोळे मिटायला मोकळी. मी तिला म्हणत असे असं बोलू नको ग आई. तर एक दिवस ती म्हणाली मी जास्त दिवस
जगावं म्हणून मुद्दाम लवकर पूर्ण करत नाहीस काय..? तिला कसं समजावू की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. अथक
परीश्रम घेऊन अखेर माझं संशोधन कार्य पूर्णत्वास गेले. मी ३० डिसेंबर २०१९ ला माझा थेसिस सबमिट केला. तो दिवस हि
माझ्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच होता. कारण दुसऱ्याच दिवशी मला युनिव्हर्सिटीतून शिक्षणशात्र विभागातील
अँपॉइन्टमेन्टचे लेटर मिळाले. मला खरंच काही सुचत नव्हतं तेव्हा.,, खूप आनंद.., सार्थकता आणि खूप काही भावना दाटून
आल्या. आईला मी जरा सावकाशच सांगितले... कारण अति आनंद ही घातकच.. मी हर्षोउल्हासाने दाटले होते... तिला किती
आनंद होईल याची मला कल्पना होती. मी तिला सांगितले - आई मला मुंबई विद्यापीठाची ऑर्डर मिळाली... काय वर्णावा मी
माझ्या माऊलीचा आनंद ... आता मला राहवेना आनंदश्रूनी मी इकडे न्हाऊन निघाले.., आणि ती तिकडे... मला कधी एकदा
तिच्या कुशीत शिरून बिलगावं असं झालं होतं. माझ्या माउलीचे स्वप्न साकार झाले होते. अकॅडमिक इयरची ऑर्डर होती. पण
मुंबई विद्यापीठात अधिव्याख्याता पदावर काम करायला मिळणे म्हणजे किती गौरवास्पद आहे. हे मी शब्दात कसे सांगू.,,?
मला तर सगळं स्वप्नवतच वाटत होतं ... आजवर आईने आमच्यासाठी घेतलेल्या अपार कष्टाचे.., अथक परिश्रमाचे ते फलीत
होते. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी - स्वकष्टाने., अनंत अडचणीवर ..,अडथळयांवर मात करून देशातील सर्वात जुन्या .,
प्रथितयश अशा विद्यापीठात पोहचली होती.
अनंत हस्ते कमलावराने देता ... किती घेशील दो कराने ......!!
अशीच माझी अवस्था झाली होती. हे फक्त आणि फक्त माझ्या आईच्या पुण्याईमुळे शक्य झाले. तिचे संस्कार.., तिची
सचोटी ., तिची जिद्द ., तिची तळमळ. किती - किती महिमा वर्णावा तिचा. खरोखरच ती खूप खंबीर आणि कणखर होती.
आणि तिच्यातील या गुणांमुळेच आम्ही घडत गेलो. आजवरच्या आयुष्यात अनेक बऱ्या - वाईट गोष्टी घडल्या. पण प्रत्येक
प्रसंगात ती खंबीरपणे पाठीशी उभी असायची . तिच्यातील ती बाणेदार वृत्ती वाखाणण्याजोगी होती.
कवी विं. दा. करंदीकरांच्या कवितेसारखा खमकेपणा तिच्यामध्ये होता....
असे जगावे दुनियेमध्ये आव्हनांचे लावुनी अत्तर..,
नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर
असे दांडगी इच्छा ज्याची , मार्ग तयाला मिळती सत्तर ..,
संकटासही ठणकावून सांगावे ., आता ये बेहत्तर...,
अगदी असेच संस्कार तिने आमच्यावर केले. तिच्या विषयी लिहिता - लिहिता माझ्या आयुष्यतील अनेक प्रसंग
बारकाव्याने मांडले गेले. किंबहुना त्याशिवाय तिच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचा उलगडा झाला नसता म्हणून ते ओघाने
आलेले आहेत. माझ्या जडणघडणीत तिचाच वाटा खूप खूप मोलाचा आहे. माझ्या संदर्भातील ती जशी मला वेगळी भेटली
अगदी तशीच माझ्या भावंडानाही भेटली असेलच ... पण प्रत्येकाचं भावविश्व् वेगळं .... त्यांच्या भावना कदाचित मी इतक्या
तरलतेने नाही मांडू शकत जितक्या मी माझ्यासंदर्भात मांडल्या. आईच्या बाबतीतील ही अनेक घटना मला माहित ही
नसतील. पण जेवढ्या तिने कधी काळी गप्पा मारता - मारता सांगितल्या त्या अगदी जश्याच्या तश्या मी मांडल्या आहेत.
आज मागे वळून पाहताना ऊर भरून येतोय. तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी ती फार थकली होती. जवळजवळ
१५ - १६ वर्ष एका जागी बसून तिचा जीव कानवडला होता. आम्ही भेटायला गेलो कि तिचा जीव आभाळाएवढा व्हायचा...
तेवढेच चार दिवस मस्त आनंदात असायची ती... आम्ही माहेरपणाला आलो की पहिल्यांदा तिच्याच हातचा कोऱ्या दूधाचा
फक्कड चहा घेऊनच मग बाकीच्या कमला लागायचो. आम्हला म्हणायची - तुम्ही माझ्या पकचिमण्या आहात... तुम्ही किती
दिवस थांबणार माझ्यासाठी. अशा ही अवस्थेत ही ती सगळी कामं स्वतः करत असे. अतिशय कष्टाळू आणि स्वाभिमानी होती
ती . शेवटपर्यंत ती कोणाच्याही उपकारात राहिली नाही. उलट तिच्या उपकाराच्या ओझ्याने दबून मोठ्ठे झालेल्यांनी तिच्याकडे
पाठ फिरवली. पण तिने कधीच कोणाला दुखावले नाही. आला दिवस आनंदात घालवत होती. न चुकता रोजच आमच्या गप्पा
व्हायच्या.... अगदी तास न तास . या लॉक डाउनच्या कालावधीतच तिला भेटता आलं नाही. पण तरीही तिला आम्ही सगळीच
भावंडं फोन करून खुशाली कळवत होतो - विचारत होतो. पण आता ती थकली होती ... तिच्या दृष्टीने तिचं आयुष्य सार्थक
झालं होतं ... आणि तिचा पैलतीराचा प्रवास सुरु होता... पण तो आमच्या लक्षातच आला नाही. आई आम्हाला माफ कर ग ...
खरंच तू अशी अचानक निसटून जाशील याची पुसटशी देखील कल्पना नाही आली तेव्हा...तुझ्या शेवटच्या क्षणी आम्ही सगळे
तुझ्याजवळ होतो ... हीच एक जमेची बाजू.. पण कितीही प्रयत्न केले तरी माझ्याच्याने तो प्रसंग नाही मला माझ्या लेखणीतून
उतरवता येत... शब्दच थिजून जातात ग. आई तू का गेलीस असं मला एकटीला टाकून. आजवरच्या आयुष्यात तुझ्याशिवाय ...
मी ...? ही कल्पनाच कधी केली नव्हती ग. काय बोलू आणि किती लिहू असं झालंय मला... हृदयाचा तळ अगदी ढवळून
निघालाय. भावनेच्या भरात माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर.... 🙏🏻
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना .,
गहिवर यावा जगास साऱ्या .., निरोप शेवटचा देताना....
स्वर कठोर त्या काळाचाही.., क्षणभर व्हावा कातर - कातर ...,
नजर रोखुनी नजरेमध्ये.. आयुष्याला द्यावे उत्तर ....!!
आई तुझं एक स्वप्न पूर्ण केल्याचं सार्थक वाटते.... पण तुझ्या स्वप्नातील हे यश अनुभवायला तू अजून थोडे दिवस तरी
असायला होतीस... तुझी अरु डॉक्टरेट झाल्याचं पाहायला ...तो आनंद ... ते सुख भरभरून जगताना तुला पाहायचं होतं ...
तुझ्या कुशीत - तुला बिलगून आनंदाश्रू ढाळायचे होते.... माझं नाव आज तुझ्या नावासहीत मुंबई विद्यापीठाच्या पोर्टलवर
झळकतंय--- हे पाहण्यासाठी तू मला अजून हवी होतीस.. हीच एक खंत मनाला सारखी टोचत रहोते.... आज तू जिथं कुठं
असशील तिथून आशीर्वादाचे चांदणेच आमच्यावर उधळत असशील... आणि यशाच्या अतिउच्च शिखरावर पोहचण्यासाठी
कृथार्थतेने भरभरून आशीर्वाद देत असशील असा माझा ठाम विश्वास आहे.
एका झंझावाती वादळासारखं तुझं आयुष्य होतं .... म्हणतात न -
वादळ होऊन जगावं...
वादळ उठवीत जगावं....
वादळासारखंच एक दिवस ---
अनंतात विलीन व्हावं...... !!
आणि ते तू अगदी तसंच जगलीस. माझ्या मनाचा बांध फुटला आहे. तो आता थांबता थांबेना. आज तुझ्या पवित्र
स्मृतीशिवाय माझ्याजवळ मौल्यवान असं काहीच नाही. तुझ्याशिवाय जगताना एक एक क्षण एका युगासारखा भासतोय. या
आठवणीच आता पुढील आयुष्यात आम्हाला सोबत आणि मार्गदर्शन करतील... अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून ... वाहिलेली
ही सुमनांजली तुला कृतज्ञातापूर्वक सादर समर्पित..... !!🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
तुझीच .....
तुझ्यावीना पोरकी.....
प्रा. अरुणादेवी सुमन सदाशिव कुरणे .
अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून ... वाहिलेली
उत्तर द्याहटवाही सुमनांजली तुला कृतज्ञातापूर्वक सादर समर्पित..... !!🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻